रामपूर : चिपळूण आगारातून रामपूर ते ओमळी फेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकण प्रवासी महासंघ यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेले वर्षभर रामपूर ते ओमळी फाटा नियमित बारमाही एसटी बंद करण्यात आली आहे. सदर गाडी रस्ता नादुरुस्त व खराब असल्याचे कारण दाखवून बंद करण्यात आली. रस्त्याचे काम झाल्यानंतर ही बसफेरी पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन रत्नागिरी येथील वाहतूक अधिकारी श्री. सुर्वे यांनी दिले होते. यानंतर रामपूर ते ओमळी फाटा या मार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले आहे.
एसटी फेरी सुरू करण्यास रस्ता योग्य असल्याबाबतची माहिती देऊन या मार्गावरील बसफेरी सुरू करावी, असे विनंतीपत्र विभाग नियंत्रण रत्नागिरी व आगार व्यवस्थापक चिपळूण यांना देण्यात आले. याबाबत आगार व्यवस्थापकांकडून शाळा सुरू झाल्यावर फेरी सुरू करू असे तोंडी आश्वासन देण्यात आले, परंतु शाळा सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही, शालेय विद्यार्थी, नोकरीधंदा व रोजगारासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी तसेच वयोवृद्ध, अपंग व आजारी शालेय विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 07/Nov/2025














