Election : चिपळूण नगर परिषदेची निवडणूक महायुतीतर्फेच लढण्याचा निर्धार

चिपळूण : चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आता पक्का झाला आहे. मात्र अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? या बाबत एकमत झालेले नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे. आता मुंबई येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असा निर्धार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई येथे चिपळूण न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजपाच्या वतीने ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आग्रही आहे. त्यामुळे या पदासाठी भाजपा महायुतीमध्ये आपला दावा करणार आहे. भाजपाकडून पाच ते सहाजण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. मात्र, आयत्या वेळेला अनपेक्षित नावदेखील या यादीत येऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र निवडणूक महायुतीमार्फतच लढवायची हा निर्णय पक्का झाला आहे.

शिंदे शिवसेनेकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मिलिंद कापडी इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपा, शिवसेना की राष्ट्रवादीला द्यायचे यावर अद्याप एकमत झालेले नाही. ही निवडणूक महायुतीच्या बॅनरवरच लढवली जाणार आहे. त्यामुळे चिपळुणात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळणार आहे. त्यात या निवडणुकीत किती अपक्ष रिंगणात उभे राहतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सद्यस्थितीत उमेदवारी मिळाली नाही तर शिंदे सेनेचे सुधीर शिंदे यांनी निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. दुसऱ्या बाजूला पत्रकार सतीश कदम अपक्ष म्हणून इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून रमेश कदम यांचे नाव चर्चेत असले तरी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे तर ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्ष पदावरील आपला दावा सोडल्याचे चर्चिले जात आहे. मात्र काँग्रेसचे लियाकत शाह काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या निर्णयात आगामी काळात कोण बंडखोरी करणार की पक्षाबरोबर राहणार हे स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 08/Nov/2025