टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांची नियुक्ती कायमस्वरूपी

नवी दिल्ली : उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच आठवड्यात सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना ट्रस्टचे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे निश्चित कालावधीसाठी ट्रस्टवर करण्यात येणारी नियुक्तीची प्रथा संपुष्टात येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मागच्या आठवड्यात दोन्ही ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापुढे ट्रस्टवरील कोणताही सदस्य स्वत: राजीनामा देत नाहीत तोपर्यंत निवृत्त होणार नाही. सर्व सदस्यांच्या संमतीनंतरच नव्या सदस्यांची नियु्क्ती केली जाईल. सध्या विश्वस्तांची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जात होती. (वृत्तसंस्था)

३० कंपन्यांचे व्यवस्थापन

आयटी, हॉटेल, विमानोड्डाण, ऑटोमोबाइल, ग्राहकोपयोगी उत्पादने, आदी विविध क्षेत्रांमधील ३० कंपन्यांचे व्यवस्थापन टाटा सन्सकडून केले जाते. अलीकडच्या वर्षांत टाटा सन्सने जग्वार लँड रोव्हर आणि टेटली टी यांसारखे ब्रँड्स विकत घेऊन जागतिक व्यावसायिक समूह विकसित केला आहे.

कशी आहे ट्रस्टची रचना?

सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना १९१९ मध्ये तर सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्थापना १९३२ मध्ये झाली. सर रतन टाटा ट्रस्टवर सात विश्वस्त आहेत, तर सर दोराबजी टाटा ट्रस्टवर सहा संचालक आहेत. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नूसेरवानजी टाटा यांची मुले रतनजी टाटा आणि दोराबजी टाटा यांच्या स्मरणार्थ हे दोन्ही ट्रस्ट स्थापन करण्यात आले होते.

ट्रस्टकडे निम्म्याहून अधिक शेअर्स

११ ऑक्टोबर रोजी ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती झाल्यानंतर ट्रस्टच्या संचालकांच्या दोन बैठका झाल्या आहेत. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. या दोन्ही ट्रस्टकडे १६५ अब्ज डॉलर्सची होल्डिंग असलेल्या टाटा सन्सचे निम्म्याहून अधिक शेअर्स आहेत. टाटा सन्सचे सर रतन टाटा ट्रस्टकडे २७.९८ टक्के, तर सर दोराबजी टाटा ट्रस्टकडे २३.५६ टक्के शेअर्स आहेत. टाटा ट्रस्ट या समूहाच्या सर्व परोपकारी उपक्रमांचे व्यवस्थापन करते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 24-10-2024