Maha Vikas Aghadi : “राजापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार”

राजापूर : राजापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा शिवसेना व मनसेसह अन्य छोटे मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविणार असल्याची घोषणा शनिवारी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी आमदार गणपत कदम व एड. सौ. हुस्स्रबानू खलिफे यांनी केली.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या जागा वाटपाबाबतही चर्चा पुर्ण झाली असून उमेदवारी अर्ज ज्या दिवशी दाखल करू त्या दिवशी यादी जाहिर केली जाणार असल्याचेही कदम व खलिफे यांनी सांगितले. मनसे देखील महाविकास आघाडीत असल्याचे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली. यापुर्वी नगर परिषदेत काँग्रेस सत्तेत तर शिवसेना विरोधी गटात होती. आता नियतीनेच आंम्हाला एकत्र आणले असून महाविकास आघाडी म्हणून या निवडणूकीत उतरून सत्ता प्रस्थापित करू असा दावा कदम व खलिफे यांनी केला आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह सर्व दहा प्रभागांतील २० जागा आंम्ही महाविकास आघाडीचे पक्ष लढविणार आहोत, अन्य छोटया पक्षांसह संस्था व सामाजिक संस्थाही आमच्या सोबत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी उमेदवारांची निश्चितीही महाविकास आघाडीच्या माध्यमातुन करण्यात आली असून उमेदवारांची घोषणा ही ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करू त्या दिवशी केली जाईल असे सांगण्यात आले.

राजापूरात गेल्या दोन दिवसात काही राजकिय घडामोडींबाबत चर्चा सुरू होती, काँग्रेसचा गट शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती, यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, कोण कोणाला भेटले म्हणून पक्ष प्रवेश होत नाही, अशा चर्चा व भेटी होत असतात, त्यामुळे अशा प्रकारे कुणी पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, आंम्ही महाविकास आघाडीत आहोत, व महाविकास आघाडी म्हणून लढणार जिंकणार असे एड. सौ. खलिफे यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अनुपस्थित होते, यावर विचारले असता ते आमच्या सोबत असल्याचे व बोलणे झाल्याचे खलिफे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषेला शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुका अध्यक्ष कमलाकर कदम, शहर अध्यक्ष संजय पवार, तात्या सरवणकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे, शहर अध्यक्ष आजिम जैतापकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष राजू पवार, तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 08/Nov/2025