रत्नागिरी : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारसंहिता कालावधीत) निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी लागू केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ साठीचा कार्यक्रम दि. ४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी /उपविभागीय दंडाधिकारी /तालुका दंडाधिकारी कार्यालय जिल्ह्यातील तसेच सर्व सार्वजनिक शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.
त्यासाठी सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी जिंदल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडील दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारसंहिता कालावधीत) निर्बंध घालत असल्याचा आदेश दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 08/Nov/2025














