“रत्नागिरीचा नगराध्यक्ष महायुतीचाच!” उदय सामंतांचा ‘संकष्टी’ मुहूर्तावर ठाम विश्वास; बाळ मानेंवर ‘डांबरी’ टोला

रत्नागिरी, प्रतिनिधी : येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराला आज प्रभाग क्रमांक ५ मधून दणक्यात सुरुवात झाली. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आयोजित या पहिल्याच प्रचार सभेला संबोधित करताना, पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “रत्नागिरीचा नगराध्यक्ष महायुतीचाच होणार!” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी कथित डांबर घोटाळ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना “ज्यांना जनतेने चार वेळा डांबर फासलं,” अशा शब्दात सणसणीत टोला लगावला, तसेच रत्नागिरीकरांना ७ दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांचा शब्दही दिला. या सभेला महायुतीचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

“महायुतीचाच नगराध्यक्ष होणार!”

मंत्री उदय सामंत म्हणाले, “दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा प्रचाराला सुरुवात रत्नागिरीतून होत आहे, आणि तीही संकष्टीच्या शुभ दिवशी. त्यामुळे मी आजच लिहून देतो की, या नगरपालिकेवर महायुतीचाच नगराध्यक्ष होणार आहे.”

“भाजप आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर केला.

“ज्यांना ४ वेळा डांबर फासलं…”

रस्त्यांच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी विरोधकांवर, विशेषतः बाळ माने यांचे नाव न घेता, घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “चांगल्या कामाचं श्रेय मी घेतो, तशी रखडलेल्या कामांची जबाबदारीही माझीच आहे. पण रस्ता म्हटला की विषय निघालाच. ज्या लोकांना चार वेळा जनतेने ‘डांबर फासलं’ आहे, त्यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही.”

ते पुढे म्हणाले, “ही जुनीच टेप आहे. प्रत्येक निवडणुकीला माझ्यावर टीका होते, तेव्हा समजायचं की निवडणूक आली आहे. जे राजकीयदृष्ट्या संपलेले आहेत, त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील. त्यांच्यावर बोलून मला त्यांना मोठं करायचं नाही,” असा चिमटाही त्यांनी काढला.

७ दिवसांत रस्ते चकाचक होणार!

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर सामंत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “विकासकामे कितीही झाली तरी नागरिकांचं लक्ष रस्त्यावर असतं, हे मला मान्य आहे. यावर्षी १४ मे पासून सुरू झालेला पाऊस आजही पडतोय. आपण निसर्गावर मात करू शकत नाही. पण निसर्गाला दोष देण्यात अर्थ नाही. मी शब्द देतो, पुढच्या ७ दिवसांमध्ये रत्नागिरी शहरातील सगळेच्या सगळे रस्ते तुम्हाला अपेक्षित आहेत तसे चकाचक केले जातील. कालपासून कामाला सुरुवातही झाली आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

“उमेदवार लादणार नाही, परफॉर्मन्स द्या!”

उमेदवारीवरून पक्षात आणि महायुतीत सुरू असलेल्या चर्चेवर सामंत यांनी स्पष्ट केले, “माझ्या डाव्या-उजव्या बसणाऱ्या किंवा गाडीत फिरणाऱ्या लोकांना तिकीट मिळेल, अशी शंका काहींच्या मनात आहे. पण मी स्पष्ट सांगतो, आमच्या डोक्यात असलेले नव्हे, तर तुमच्या मनात असलेले, तुमच्या सुखदुःखात उभे राहणारे उमेदवारच दिले जातील. उमेदवार लादले जाणार नाहीत.”

त्यांनी निवडून येणाऱ्या नगरसेवकांसाठी एका वर्षाची ‘डेडलाईन’च जाहीर केली. “पुढच्या ३६५ दिवसांत आपल्याला रत्नागिरी ‘स्मार्ट सिटी’ करून दाखवायची आहे. जे नगरसेवक एक वर्षात परफॉर्मन्स दाखवणार नाहीत, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. अशा नगरसेवकांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असा सज्जड दमच त्यांनी इच्छुकांना भरला.

विकासाचा रोडमॅप: ‘एज्युकेशन हब’ ते ‘विमानतळ’

उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅपही जनतेसमोर ठेवला:

  • एज्युकेशन हब: “रत्नागिरीला एज्युकेशन हब बनवण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, टाटांचे स्किल सेंटर ही त्याची उदाहरणे आहेत.”
  • नोकरी: “चंपक मैदानावर २०,००० कोटींचा ‘व्हीआयटी सेमीकंडक्टर’चा भारतातला पहिला प्रकल्प सुरू झाला आहे. यामुळे आपल्या मुलांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईला जावं लागणार नाही.”
  • उद्योग: “लोटे परशुराममध्ये ‘कोका-कोला’चा प्लांट सुरू होत असून, दोन महिन्यांनी आपण ‘रत्नागिरीत’ तयार झालेली कोका-कोला पिणार आहोत. तसेच, वाटद येथे देशाच्या सैनिकांसाठी बंदुका बनवण्याचा १० हजार कोटींचा डिफेन्स प्रोजेक्ट उभा राहत आहे.”
  • इन्फ्रास्ट्रक्चर: “१२० कोटींचे नवे जिल्हाधिकारी कार्यालय, १६० कोटींची पोलीस वसाहत, ९० कोटींची जिल्हा परिषद इमारत आणि राज्यात बक्षीस मिळवणारे एसटी स्टँड उभे राहिले आहे.”
  • विमानसेवा: “पुढच्या मे महिन्यामध्ये रत्नागिरीकर १६०० रुपयांत विमानाने मुंबईला जाणार आहेत. विमानतळाचे ६०% काम पूर्ण झाले आहे.”

शेवटी, “माझी राज्यस्तरावरील ताकद वाढवण्यासाठी, तुमच्याच कुटुंबातला एक घटक म्हणून, महायुतीच्या संपूर्ण पॅनलला एकगठ्ठा मतदान करा,” असे भावनिक आवाहनही उदय सामंत यांनी रत्नागिरीकरांना केले.