गुहागर : दिराकडून भावजयीचे घर जमीनदोस्त

गुहागर : गुहागर तालुक्यातील मढाळ येथील नेहा संतोष सोलकर यांच्या मालकीचे घर (क्रमांक २९५) हे त्यांचे दीर विनायक रामचंद्र सोलकर (रा. मढाळ) यांनी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याची तक्रार नेहा सोलकर यांनी गुहागर पोलिस ठाणे, तहसीलदारांकडे केली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार, नेहा सोलकर व विनायक सोलकर हे नात्याने भावजय- दीर असून, त्यांच्यामध्ये जमीन जागेवरून वाद आहेत. मागील काही महिने हे वाद सुरू आहेत. विनायक सोलकर हे नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत असून अधूनमधून कामानिमित्त तसेच ते गावी येत असतात. गावी आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद करून शिवीगाळ, दमदाटी करीत असतात. तसेच तुझ्या घरावर जेसीबी फिरवणार तसेच जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नेहा सोलकर यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल नलावडे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 24-10-2024