रत्नागिरी : तालुक्यातील परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय भागात भुताने पत्नीला उचलून नेऊन खून केला असल्याचा बनाव गजानन भोवड रचणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खुनाची ही घटना २५ जून २०२१ मध्ये घडली होती.
गजानन जगन्नाथ भोवड (४५, रा. परुळे, सुतारवाडी, ता. राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. गजानन भोवड व त्याची पत्नी सिद्धी ऊर्फ विद्या गजानन भोवड हे कुटुंब २०१९ कोव्हिडच्या काळात परुळे येथील आपल्या गावी आले होते. मात्र, पत्नी सिद्धी ही आरोपीला वेळेवर जेवण न देणे, मुलांकडे व्यवस्थित लक्ष न देणे तसेच पतीला आई-वडिलांवरून शिवीगाळ करणे, तसेच आरोपीचे अन्य स्त्रियांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण होत असत. या रागातून पतीने २५ जून २०२१ रोजी दुपारी पत्नी सिद्धीला मी तुला तुझ्या बहिणीकडे नेतो, असे सांगून परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय भागात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिचे नाक व तोंड दाबून तिला ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह तेथील गवतात लपवला. दरम्यान, पत्नीला भुताने मारले, असे गावातील ग्रामस्थांना सांगितले.
या घटनेचा तपास राजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मौळे करत होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तपासात आरोपीने पत्नीच्या खुनाचा बनाव केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादवी कलम ३०२, २०१, १७७ अन्वेय गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
तपासअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. १० नोव्हेंबर रोजी खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यापैकी आरोपीची बहीण, मेहुणा, सरपंच हे महत्वाचे साक्षीदार फितूर झाले. मात्र, केवळ परिस्थितीजन्य पुराव्यात डॉ. अजित पाटील, डॉ. विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे, मयत सिद्धी यांची बहीण-सोनाली शिंदे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपी पतीला या खटल्यात दोषी धरुन भा. दं. वि. कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात तपासिक अंमलदार म्हणून राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर व पैरवी म्हणून पोलिस शिपाई विकास खांदारे यांनी काम पाहिले.
मृत महिलेच्या आईस दंडातील पाच हजार
५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, पुरावा नष्ट करणे यामध्ये ३ वर्षे कारावास १ हजार रुपये दंड तसेच खोटी खबर देणे यामध्ये पाचशे रुपये दंड १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार मृत सिद्धीच्या आईला देण्यात येतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Nov/2025














