राजापूर : विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत तयार केले आकाशकंदील

राजापूर : दिवाळीचे साऱ्यांना वेध लागले असून, दिवाळीच्या पूर्वतयारीची धामधूम सुरू झाली आहे. अशातच शहरातील विश्वनाथ विद्यालयामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा झाली. कार्यशाळेमध्ये जयेश हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही आकाशकंदील विद्यार्थ्यांनीही तयार केले.

दिवाळीसाठी मागणी असलेल्या विविध वस्तूंनी बाजारपेठही सजू लागली आहे. बाजारपेठेला दिवाळीच्या अनुषंगाने तेजी येऊ लागली आहे. दिवाळीमध्ये घरोघरी विविध प्रकारचे आणि रंगाचे आकाशकंदील प्रकाशित केले जातात. अनेकवेळा बाजारपेठेमध्ये मिळत असलेले रेडिमेड आकाशकंदील लावण्यावर लोकांचा भर असतो. अशा स्थितीमध्ये शहरातील विश्वनाथ विद्यालयामध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याता वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्वेता भिडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये हर्डीकर यांनी आकर्षक आकाशकंदील बनवण्याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यामध्ये विशेषकरून पारंपरिक पद्धतीने आकाशकंदील कसा तयार करावा, यासंबंधी हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील तयार करण्याची स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आहे विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, श्वेता भिडे, मुख्याध्यापिका अक्षता रहाटे, शिक्षिका बाणे, नलावडे, महाडीक, खरात, कोंडे, माने, नांदवडेकर, कातकर, पालक संतोष जुवळे, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 24/Oct/2024