Dana Cyclone : ओडिशाच्या किनारपट्टीवर आज दाना वादळ धडकणार; १२० ते १३० किमी असणार वेग

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ‘दाना’ आज २४ ऑक्टोबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकू शकते. चक्रीवादळ रात्री उशिरा भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ येऊ शकते.

या काळात वादळाचा वेग ताशी ११०-१२० किलोमीटर असू शकतो. वादळ किनारपट्टीवर येण्यापूर्वीच ओडिशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने बंगाल आणि ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य आणि सीमेवरील उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील “दाना” वादळ गेल्या ६ तासात ताशी १२० किमी वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे. हे पारादीप (ओडिशा) च्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २१० किमी, धामराच्या २४० किमी आग्नेय आणि सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) ३१० किमी दक्षिणेकडे केंद्रित होते.

वादळामुळे ओडिशातील अनेक भागात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दाना वादळाची भीती लक्षात घेऊन रेल्वेने जवळपास १८० एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २३ ऑक्टोबरला वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्ड, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत ‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वे सेवेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रेल्वेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.

कोलकाता विमानतळावर २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत हवाई सेवेवरही बंदी घालण्यात आली आहे. ओडिशा सरकारने १४ जिल्ह्यातून १०,६०,३३६ लोकांना बाहेर काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ओडिशातील पुरी, खुर्दा, गंजाम आणि जगतसिंगपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 24-10-2024