चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली; परंतु सलग दुसऱ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज प्रांत कार्यालयात दाखल झालेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोंगडे भिजत पडल्याने इच्छुक उमेदवार बुचकळ्यात पडले आहेत. परिणामी, गेल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी दाखल झालेली नाही.
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचे आहेत. त्याची प्रत प्रांत कार्यालयात उमेदवारांनी ऑफलाईन द्यायची आहे. चिपळुणात महाविकास आघाडीत सलग तीन बैठका झाल्या; मात्र आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी नगराध्यक्षपदावर ठाम राहिल्याने तोडगा निघालेला नाही. परिणामी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दुसरीकडे महायुतीत राष्ट्रवादीत अजित पवार गटास जिल्ह्यात एकाही ठिकाणी नगराध्यक्षपद मिळत नसल्याने पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
चिपळुणात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने चिपळूणची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती; मात्र ती नाकारल्याचे समजते. यातूनच मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला डावलून शिवसेना शिंदे गट आणि भाजपची बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 12/Nov/2025









