खेड : तालुक्यातील भरणे येथील तालुका कृषी रोपवाटिकेसमोरील मोकळ्या जागेत दर मंगळवारी भरवण्यात येणाऱ्या आठवडा बाजारास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या बाजारातून भरणे ग्रामपंचायतीला भरघोस उत्पन्न मिळत असले, तरी त्या प्रमाणात व्यावसायिक व ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत मात्र उदासीन आहे.
या बाजारात स्वच्छतागृहाच्या अभावामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्याची सोयही नसल्याने बाजारात दिवसभर राहणाऱ्यांची परवड होते. भरणे येथील हा आठवडा बाजार तालुक्यातील एकमेव मोठा बाजार असून, जीवनावश्यक वस्तूंपासून ते इतर सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील विविध भागांतून ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. कोल्हापूर, पाटण, कराड या घाटमाथ्यावरील भागांतून तसेच परिसरातील जवळपास १०० हून अधिक लहान-मोठे व्यावसायिक येथे व्यापार करतात. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री सुरू असते; मात्र स्वच्छतागृह व पाणीपुरवठासारख्या मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नसल्याने नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष घालून स्वच्छतागृह व पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा तत्काळ पुरवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय विचारे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 12/Nov/2025














