Rajapur : नाटे शाळेतील धान्य चोरीप्रकरणी मुख्याध्यापक व उपशिक्षक यांना निलंबित करण्याचे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश

जैतापूर : राजापूर तालुक्यातील नाटे नगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, नाटे येथील शालेय पोषण आहार कामकाजामध्ये अनियमितता व धान्य चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने व यात मुख्याध्यापक व उपशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने संबंधित मुख्याध्यापक व उपशिक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रविंद्र तानु जाधव, मुख्याध्यापक, नाटे नगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, नाटे, नाना बिरा करे, उपशिक्षक, नाटे नगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, नाटे, यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामपंचायत नाटे (संस्थाप्रमुख) यांना देण्यात आले आहेत.

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजापूर यांनी सादर केलेला सखोल चौकशी अहवाल (जा.क्र. पंसरा/शिक्षण/आस्था-३/१९८१/२०२५ दि. ०८/११/२०२५) तसेच सागरी पोलीस ठाणे नाटे यांचेकडील प्रथम खबर क्र. ००८२ दि. ०६/११/२०२५ या दोन्ही अहवालांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

उक्त अहवालानुसार, संबंधित मुख्याध्यापक आणि उपशिक्षक यांनी शालेय पोषण आहार कामकाजामध्ये अनियमितता व धान्य चोरीसारखे गंभीर गैरवर्तन केले असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक २८ (५) (अ) (क) (१) तसेच नियम क्रमांक ३३ (१) (५) (६) नुसार निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित संस्थेला ही कार्यवाही करून तिचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 12/Nov/2025