चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून होणार बंद

सिंधुदुर्ग : ऐन दिवाळीच्या तोंडावरच प्रवाशांना फटका बसणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा (Chipi-Mumbai Airlines) 26 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती.

मात्र त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.

तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गातील ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु झाली होती. सिंधुदुर्गवासीयांसाठी ही निश्चितच मोठी खुशखबर होती. हे विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरली होती. ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचं उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं होतं.

ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का

ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

नागरिकांकडून नाराजी

दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 24-10-2024