Ratnagiri : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी निदर्शने

रत्नागिरी : सर्वसामान्य प्रवासी जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत लवकरात लवकर विलिनीकरण व्हावे, अशी अपेक्षा ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महामंत्री काँ. शिवगोपाल मिश्रा यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.

रेल्वे कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता, कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, त्यांचे भत्ते, रात्र ड्युटी भत्ता या आणि अशा प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १७नोव्हेबर रोजी अ. भा. स्तरावर निदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मिश्रा यांनी यावेळी दिली.

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन बुधवारी कोकण रेल्वे स्थानकानजीक झाले. यानिमित्ताने ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महामंत्री काँ. शिवगोपाल मिश्रा हे रत्नागिरी येथे आले होते. यावेळी ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे जे. आर. भोसले, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर यांच्यास एनआरएमयूचे स्थानिक पदाधिकारी कुमार घोसाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. मिश्रा म्हणाले की, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि. १७ नोव्हेंबर रोजी निदर्शन केली जाणार आहेत. प्रकल्पाच्या उभारणीत हिस्सा असलेल्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळ या राज्यांनी कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन व्हावे, यासाठी केंद्र सरकरकारकडे या आधीच होकार दर्शवला आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीत सर्वाधिक वाटा असलेल्या महाराष्ट्र शासनाने कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी म्हणून केंद्राला प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव पाठवलेला असताना आणि विलीनीकरण करण्यासाठी कोणताही मोठा अडथळा नसल्याने आता तातडीने विलिनीकरण व्हावे, अशी अपेक्षा श्री. मिश्रा यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 13/Nov/2025