General Election 2025 : लांजा नगरपंचायत निवडणुकीत १४,२३२ जण करणार मतदान

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यामुळे प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. लांजा नगर पंचायत निवडणुकीत एकूण १४ हजार २३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीसाठी नगर पंचायत हद्दीत एकूण १९ मतदान केंद्राची उभरण्यात आली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ हजार २८६ आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून या प्रभागातून १७ सदस्य नगरसेवक म्हणून निवडून दिले जाणार आहेत. शहराची निर्धारित केलेली मतदार संख्या १४ हजार २३२ इतकी आहे. त्यात पुरुष मतदार संख्या ७,०८७ तर महिला मतदार संख्या ७,१४५ इतकी आहे.

सर्वात मोठा मतदार संख्या असलेल्या प्रभागांमध्ये आठ क्रमांकाचा प्रभाग असून यामध्ये १ हजार ५४ मतदारसंख्या आहे, तर सर्वांत कमी मतदार संख्या प्रभाग सात मध्ये ६१५ इतकी मतदार संख्या आहे. शहरात या निवडणुकीसाठी १९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात झाली असून प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १४ या दोन प्रभागांसाठी प्रत्येकी २ दोन केंद्रे व इतर १५ प्रभागांसाठी प्रत्येकी १ केंद्र देण्यात आले आहे.

२ डिसेंबर रोजी मतदान सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत, तर मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी लांजा नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात केली जाणार आहे.

सर्व मतदान केंद्रांची पाहणी प्रशासन स्तरावरून करण्यात आली आहे. त्याठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत मतदारांकडून एका प्रभागातून एक सदस्य आणि एक थेट नगराध्यक्ष अशा दोघांना मतदान करण्यात येणार आहे.

अद्याप एकही अर्ज दाखल नाही!
दरम्यान, सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच लांजा नगरपंचायतीकरिता राजकीय पक्षांकडून अद्याप ही उमेदवारी निश्चित न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. त्यामुळे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीही उमेदवारीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 13/Nov/2025