Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak : संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार : सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या संकल्पचित्राचे बुधवारी सादरीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील या संकल्पचित्राच्या अनुषंगाने मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण मंत्री शेलार यांच्यासमोर करण्यात आले.

प्रस्तावित स्मारक ५ एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त २ एकर जागा शासनाने घेतली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांची संकल्पना समजून घेण्यासाठी मंत्री शेलार यांच्या दालनात बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच, आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवा, सुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 13/Nov/2025