रत्नागिरी : ठाकरेंच्या शिवसेनेकडून रत्नागिरीच्या विधानसभा उमेदवाराची घोषणा होताच वातावरण ढवळून निघाले आहे. बीजेपीचे बाळ माने यांनी मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश करताच त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सर्व शिवसैनिकांनी उदय बने अथवा राजू महाडिक या दोघांपैकी कुणीही उमेदवार पक्षाने द्यावा अशी मागणी केली होती. बाळ माने यांचे नाव चर्चेत आल्यावर देखील निष्ठावंतालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका देखील अनेकांनी घेतली होती. मात्र त्या सर्वांचा भ्रमनिरास झाला. काल बाळ माने यांची उमेदवारी जाहीर होताच आता निष्ठावंतांना डावलल्याचे कारण देत उबाठा च्या महिला तालुकाप्रमुख साक्षी रावणांग यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आज हॉटेल विवेक येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश करण्याचा हा ट्रेंड असाच २३ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्येक दिवशी एक नवा प्रवेश असेल. आज रात्री ९ वाजता चांदोर येथे आणखी एक प्रवेश होणार असून येत्या दोन दिवसात एक मोठा कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.












