देवरुख : साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आयुक्त कार्यालयाशी आपल्या चर्चा सुरू आहेत. याचप्रमाणे तेथील बाजारपेठेचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. याचबरोबर युवा प्रशिक्षणार्थीना न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी विकासात्मक कामांबाबत चर्चा करत असताना दिली.
साखरपा हे गाव मिऱ्या-नागपूर या मुख्य महामार्गावर असल्याने सध्या असलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे भविष्याच्या दृष्टीने कमी पडणारे आहे. या महामार्गावर होणारे अपघात व वाढती लोकसंख्या याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव कोकण आयुक्त कार्यालयाकडे दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
याचबरोबर साखरपा मुख्य बाजारपेठेतील खराब झालेला रस्ता येथून होणारी सततची वाहतूक, यासाठी हा रस्ता नूतनीकरण गरजेचे आहे. हा रस्ता थोडा सिमेंट काँक्रीटचा व थोडा डांबरीकरणाचा केला जाणार आहे. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने बेरोजगार युवकांना शासकीय कार्यालयाची माहिती व्हावी व त्यांना अर्थाजनाचा मार्ग म्हणून युवा प्रशिक्षक अशी भरती करण्यात आली. हा कालावधी ६ महिन्यांचा देण्यात आला होता. यात थोडी वाढ करून ५ महिने वाढविण्यात आला होता. हा कालावधी पूर्ण झाला असल्याने युवा प्रशिक्षक पुन्हा बेरोजगार झाले आहेत. यामुळे युवा प्रशिक्षकांकडून आंदोलने उभारली जात आहेत. आपला त्यांना पाठिंबा असून या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी नमूद केले. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल असा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 14/Nov/2025














