Maha Vikas Aghadi : खेड नगराध्यक्षासह १७ नगरसेवक निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

खेड : खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत खेड नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकांपैकी १७ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केल्याची माहिती शहरातील कुंभारआळी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार काँग्रेस परिषदेत देण्यात आली.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे हुसेन दलवाई, रमेश कीर आदींनी महाविकास आघाडीतर्फे यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव, खराब रस्ते यांच्यासह आतापर्यंत पोकळ आश्वासने दिली गेली. त्यामुळे येत्या निवडणुकीत खेडची जनता मतदानाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करणार असल्याचा दावा गौस खतीब यांनी केला आहे.

खेडची जनता विकासाच्या बाजूने असल्याचा दावा बाळा खेडेकर यांनी करून जनता कोणाच्याही भुलथापाना न भुलता विकासाच्या बाजूने राहणार असल्याचे सांगितले. एकमेकांवर आरोप करणारे, चौकशा लावणारे आता सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र आम्ही यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे बाळा खेडेकर यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे बाळा खेडेकर, काँग्रेसचे गौस खतीब, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजीम सुर्वे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 14/Nov/2025