रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व उघड्या मॅनहोलमुळे नागरिक जखमी व मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात जखमी अथवा मरण पावणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असेल. सार्वजनिक रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास जखमी व मृतांच्या वारसांना भरपाई मिळणार आहे.
सार्वजनिक रस्त्यावर खड्ड्यांमुळे संबंधित विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेमधील आदेशानुसार नागरी सुविधा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकार यांची नागरिकांना सुरक्षित व सोयीचे रस्ते देण्याची सांविधानिक व कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर झाल्यास ती बाब नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली ठरणार आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अथवा उघड्या मॅनहोलमुळे अपघात होऊन मरण पावल्यास अशा व्यक्तींच्या वारसांना चौकशीअंती यासाठी संबंधित संस्था या ६ लाख रुपये नुकसान भरपाई देतील. जखमी व्यक्तीला चौकशीअंती ५० हजार ते २ लाख ५० हजार नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
यासाठी संस्थांकडे आलेले नुकसान भरपाईचे अर्ज ताबडतोब संबंधित समितीकडे दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. अशी रक्कम उपलब्ध नसेल तर नगरपरिषद, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए एमएसआरडीसी, म्हाडा, बीपीटी, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ही रक्कम अदा करावयाची आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 15/Nov/2025














