Kokan Railway Station : कोकण रेल्वे स्थानकांमध्ये आता पोलिसांची गस्त

खेड : कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांची पर्स व दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता रेल्वे स्थानकांवर पोलिस गस्त वाढवली आहे.

गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या पर्समधून दागिने व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः ‘कोकणकन्या’ व ‘मत्स्यगंधा एक्स्प्रेस’ सारख्या गाड्यांमधून सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेचा गैरफायदा घेत चोरट्यांकडून दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले होते.

या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान आता प्रत्येक प्रमुख स्थानकावर तैनात केले आहेत. दिवस-रात्र सुरू असलेल्या या गस्तीमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. रेल्वे पोलिसांकडून पूर्वीच्या चोरींचा उलगडा करण्यात अपयश आले असले, तरी नव्या गस्त व्यवस्थेमुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यास मदत होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Nov/2025