10th 12th Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्तीसाठी शिक्षण विभाग एकवटला

रत्नागिरी : दहावी, बारावीची परीक्षा कॉपी व गैरप्रकारमुक्त व्हावी, याकरिता शिक्षण विभाग एकवटला आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळात ‘कॉपी’ आढळली नव्हती. मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तयार केलेल्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग : सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या महिनानिहाय वार्षिक नियोजन पुस्तिकेचे प्रातिनिधिक वाटप जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना केले आहे. यामुळे गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी सूक्ष्म नियोजन केले आहे.

सचिव सुभाष चौगुले म्हणाले, या वर्षीच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे, पुढील वर्षी ही पुस्तिका आणखीन दर्जेदार आणि समृद्ध बनवण्यात येईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या सहकार्याने ही पुस्तिका तयार करण्यात आली. या सर्व जिल्ह्यांतील शाळांना ती मोफत वितरित करण्यात येणार आहे. याप्रसंगी बोर्डाचे सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण फाटक, बोर्डाचे वरिष्ठ अधीक्षक दीपक पवार, विभागीय अध्यक्ष बी. बी. पाटील, राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष अयुब मुल्ला (रत्नागिरी), यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ही पुस्तिका केवळ एक वार्षिक वेळापत्रक नाही, तर शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि नैतिक संस्कारासाठी प्रेरणा देणारी मार्गदर्शिका ठरेल. ‘कॉपीमुक्ती’ची सुरुवात आत्मविश्वासातून आणि शिस्तबद्ध नियोजनातून होते.”- राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर, कोकण विभागीय मंडळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 15/Nov/2025