पावस : रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावचे शेतकरी साई प्रमोद कदम यांनी शेळीपालन व्यवसायातून यशाचा मार्ग दाखवला आहे. हा आदर्श सर्वांनी घेतल्यास भविष्यात चांगल्याप्रकारे शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो
साई कदम यांचे कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने भात शेती करत. अल्प जमिनीतून पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून घर चालवणं कठीण होतं. त्यामुळे २०१४ मध्ये दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोकण कन्याळ जातीच्या केवळ दोन शेळींपासून व्यवसायास सुरुवात केली. पुढे २०१४ मध्ये त्यांनी शेळीपालनावर आधारित विविध प्रशिक्षणे घेतली. त्यांनी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण शेळी पालन योजनेचा लाभघेऊन शेळी खरेदीवर ५०% अनुदान मिळवले. त्यांनी उस्मानाबादी आणि सिरोही जातीच्या शेळ्या आणल्या आणि व्यवसाय वाढवला.
त्यांच्या निदर्शनास आले की, कोकणातल्या पावसाळी, जास्त आद्रतेच्या वातावरणास या जाती तग धरू शकत नव्हत्या, पण कोकणातल्या स्थानिक जाती असल्या वातावरणास प्रतिकारक होत्या, पण त्यांची वजन वाढ कमी होती. म्हणून त्यांनी स्थानिक जातींचा बोअर, सिरोही, हैदराबादी, कोटा यासारख्या जातींचा संकर करून वाढीस चांगल्या व हवामानास प्रतिकारक शेळ्या उत्पन्न केल्या.
शेळ्यांच्या मांसाबरोबरच त्यांच्या लेंडीलाही शेतीमध्ये फार महत्त्व आहे. त्यामध्ये सरासरी १.३% नत्र, ०.५% स्फुरद आणि १.५ % पालाश आढळतं. त्यांच्याकडे १५-२० शेळ्यांचा कळप कायम राखला जातो. ईदसारख्या सणांना आजूबाजूच्या गावांमध्ये बकऱ्यांची विक्री होते. या व्यवसायातून त्यांना प्रतिवर्षी सव्वादोन लाखांचे उत्पन्न प्राप्त होते. या व्यवसायाने त्यांना आर्थिक उन्नती प्राप्त करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 15/Nov/2025














