दापोली : पुढील पाच वर्षे मूलभूत सेवेबरोबरच रोजगारनिर्मिती, प्रकल्प आणणे यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी केले.
दापोली मतदारसंघातून आमदार योगेश कदम यांनी शिंदे शिवसेनेतून गुरुवारी (ता. २४) अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आझाद मैदान येथून शिवसैनिकांनी प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढली. त्यानंतर उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले आणि तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडे दिला.
या वेळी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, सिद्धेश कदम, ज्योती कदम, श्रेया कदम, चंद्रकांत उर्फ अण्णा कदम उपस्थित होते. त्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात योगेश कदम म्हणाले, आज मला वंदनीय बाळासाहेबांची आठवण झाली. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मला राजकारणात अखंड साथ दिली म्हणून मी अडीच हजार कोटींवर विकासकामे करू शकलो. पहिली पाच वर्षे ही मतदारसंघातील मूलभूत सुविधा पुरवण्यात गेलो. आता पुढील पाच वर्षे मुलभूत सेवेबरोबरच रोजगार निर्मिती, प्रकल्पांना मंजुरी आणून तरुणांना मतदार संघ सोडून बाहेर जावे लागणार नाही, या प्रयत्नात घालवणार आहे. आज शिवसैनिकांनी केलेली गर्दी पाहता यश निश्चितच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रितम रूके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सुधीर कालेकर यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 25/Oct/2024












