रत्नागिरीकरांसाठी वैचारिक मेजवानी! २१ ते २३ नोव्हेंबर ‘भगवान परशुराम व्याख्यानमाला’; ‘पसायदान’ ते ‘शिवाजी महाराज-मॅनेजमेंट गुरू’ अशा विषयांची पर्वणी

रत्नागिरी: रत्नागिरीतील रसिक श्रोत्यांसाठी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी तर्फे (Akhil Chitpawan Brahman Vidyarthi Sahayak Mandal) ‘भगवान परशुराम व्याख्यान माले’चे (Bhagwan Parshuram Vyakhyan Mala) आयोजन करण्यात आले आहे.

ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला २१, २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रंगणार आहे. दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत, भगवान परशुराम सभागृह, (द्वारा ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह), जोशी पाळंद, रत्नागिरी येथे ही व्याख्याने होणार आहेत.

या व्याख्यानमालेत ‘ज्ञानेश्वरांचे पसायदान’, ‘अपरिचित रामायण’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज-द मॅनेजमेंट गुरू’ अशा विविध आणि रंजक विषयांवर नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

दिवस पहिला: ‘ज्ञानेश्वरांचे पसायदान’ (२१ नोव्हेंबर)
व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता डोंबिवली येथील प्रसिद्ध वक्ते श्री. विशाल कवीश्वर यांच्या व्याख्यानाने होईल. ते ‘ज्ञानेश्वरांचे पसायदान’ या विषयावर बोलणार आहेत.

श्री. कवीश्वर (B.Com, G.D.C & A) हे विविध विषयांवरील व्याख्यानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मते, समाज पसायदानाकडे केवळ कार्यक्रमाची सांगता करणारी प्रार्थना म्हणून पाहतो, मात्र पसायदान हा एक अमर्याद समुद्र असून ती जगत् कल्याणासाठी केलेली ‘विश्व प्रार्थना’ आहे. या तळमळीच्या स्तोत्राचा खरा अर्थ ते या व्याख्यानातून उलगडणार आहेत.

दिवस दुसरा: ‘अपरिचित रामायण’ (२२ नोव्हेंबर)
शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध वक्ते CA श्री. चंद्रशेखर वझे हे ‘अपरिचित रामायण’ या आगळ्यावेगळ्या विषयावर प्रकाश टाकतील.

या व्याख्यानातून ते वाल्मिकी-रामायणातील सर्वसामान्यपणे लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहेत. श्री वाल्मिकी कोण होते? त्यांनी रामायण का लिहिले? आपल्याला माहीत नसलेल्या कोणत्या गोष्टी रामायणात आहेत? आणि आपल्याला माहीत असलेल्या कोणत्या गोष्टी मूळ रामायणात नाहीत? ‘रामराज्य’ म्हणजे नेमके काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत रामायणातून नेमके काय शिकायचे, याचे मार्गदर्शन श्री. वझे करतील.

दिवस तिसरा: ‘छत्रपती शिवाजी महाराज-द मॅनेजमेंट गुरू’ (२३ नोव्हेंबर)
व्याख्यानमालेचा समारोप रविवार, २३ नोव्हेंबर रोजी मुंबईचे प्रसिद्ध वक्ते श्री. सतीश जोशी यांच्या व्याख्यानाने होईल. ते ‘छत्रपती शिवाजी महाराज-द मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर दृकश्राव्य (Audio-Visual) पद्धतीने सादरीकरण करणार आहेत.

श्री. जोशी यांनी फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये ३६ वर्षे सेवा बजावली असून ते केमिकल कंपन्यांसाठी ISO 9001 Certification Audits चे काम पाहतात. ते माहीम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे कार्यवाह म्हणूनही कार्यरत आहेत.

‘बाईपण भारी देवा’ या लोकप्रिय मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेत्री रोहिणी हत्तंगडी यांच्या यजमानांची भूमिका साकारली होती. तसेच, सध्या गाजत असलेल्या ‘दशावतार’ चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. अफझलखान वध, आग्र्याहून सुटका अशा अनेक विषयांवर त्यांनी अभिवाचनाचे कार्यक्रम केले आहेत.

या त्रिदिवसीय वैचारिक मेजवानीचा व ज्ञानाचा आस्वाद सर्व रत्नागिरीकर रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 15-11-2025