रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Municipal Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी (दि. १७ नोव्हेंबर) सर्वात मोठा राजकीय ‘भूकंप’ झाला आहे. महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar Group) प्रमुख नेते बशीर मुर्तुझा (Bashir Murtuza) यांनी, आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह, पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बशीर मुर्तुझा हे आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) प्रवेश करत आहेत. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. अजित पवार गट हा राज्यात महायुतीचा घटक असला तरी, रत्नागिरीत बशीर मुर्तुझा यांचा गट महायुतीमधूनही बाहेर पडल्याचे दिसत असून, नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या जागाही स्वतंत्रपणे लढवणार आहे. ‘रत्नागिरी खबरदार’शी संपर्क साधला असता, खुद्द बशीर मुर्तुझा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, १० प्रभागात उमेदवार
बशीर मुर्तुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी आज (सोमवार) नगराध्यक्ष पदासाठी (Nagaradhyaksha Candidate) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच, सुमारे १० प्रभागांमधून अजित पवार गटाचे उमेदवार उभे करण्याची तयारी देखील तातडीने सुरू करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्तेही आपल्या पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
‘गटबाजीला कंटाळलो, पक्षातलेच विकले गेले’ – मुर्तुझा यांचा घणाघात
हा टोकाचा निर्णय का घेतला? यावर बोलताना बशीर मुर्तुझा यांनी ‘शरद पवार’ गटातील अंतर्गत गटबाजीवर (Internal Politics) घणाघाती टीका केली. बशीर मुर्तुझा म्हणाले, “शरद पवार गटात होणाऱ्या प्रचंड गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही आघाडीत असताना, स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा न करताच अप्रत्यक्षपणे उबाठाचे बाळ माने यांनी आपली सून नगराध्यक्ष पदाची उमेदवार असल्याचा प्रचार सुरू केला.“
ते पुढे म्हणाले, “विधानसभेला आम्ही त्यांच्या (माने) पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळे आता या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, आमच्याच पक्षातील (शरद पवार गट) काहीजण विकले गेल्याने आम्ही उमेदवारी मिळवण्यात कमी पडलो,” असा गंभीर आरोपही मुर्तुझा यांनी केला आहे. या नव्या ‘तिसऱ्या’ आघाडीच्या एन्ट्रीमुळे रत्नागिरीतील निवडणुकीची सर्व समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.














