गुहागर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार, याची चर्चा रंगत चाललेली असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुती लढणार असून, महायुतीचाच विजय होणार आहे, असे संकेत दिल्याने पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपा ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने लढावा आणि महायुतीतून तो विजयी व्हावा अशा प्रकारच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाने गुहागरमध्ये येऊन दिल्याने येथील मागील अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि भाजपाच्या वेगाने कामाला लागले होते. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वात महायुतीच्या विजयाचे वातावरण या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
गेली अनेक वर्षे या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीतून नेतृत्व करणारे नातू घराण्यातील स्वर्गीय तात्या, विनयशील नेतृत्व विनय नातू आणि स्व. आमदार रामभाऊ बेंडल यांचे पुत्र, माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले राजेश बेंडल यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत नुकताच केलेला शिवसेना प्रवेश यामुळे गुहागर विधानसभेतील उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. येथील जागा भाजपच्याच पारड्यात पडणार यावर कार्यकर्ते ठाम आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही विधानसभेमध्ये भाजपला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही तर मात्र याचे दूरगामी परिणाम होतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.
महायुतीत संभ्रमाचे वातावरण
आजपर्यंत महायुतीतून गुहागर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला, याबाबत गुप्तता पाळण्यात आली असल्याने भाजप कार्यकर्ते चलबिचल झालेले असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपला बळ देणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच रत्नागिरी येथे जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकत्यांशी संवाद साधला. यावेळीही ना. चव्हाण यांनी गुहागरमध्ये महायुती लढणार आणि जिंकणार असेच सांगितले. त्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी वेट आणि वॉचवरच राहिली आहे; मात्र यामुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 25/Oct/2024












