रत्नागिरी : जिल्ह्यात देवरुख व गुहागर नगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले आहे. या ठिकाणी भाजपाची ताकद आहे. उर्वरित राजापूर, चिपळूण, खेड, रत्नागिरी येथे शिवसेना नगराध्यक्षपद लढवत आहे. सर्वच ठिकाणी महायुतीचा मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी ३२ जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेचे २६ तर भाजपच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पहाटे जाहीर केला असून शिल्पा सुर्वे यांना ही उमेदवारी दिली आहे. अतिशय नम्र आणि सुसंस्कृत असा जनतेच्या मनातील उमेदवार दिला आहे. विकास हाच आमचा ध्यास असून वर्षामध्ये रत्नागिरी एक स्मार्ट सीटी म्हणून विकसीत होईल. दोन्ही वेळा अर्ज भरताना गर्दी पाहिली तर महायुतीचा आजच विजय निश्चित झाला आहे, अजून चार दिवसांमध्ये वेगळी परिस्थिती असेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे आणि संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, साधारण आठ ते नऊ वर्षान पालिकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे वर्षामध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी आपला परफॉर्मन्स दाखवलाच पाहिजे. पक्षात कोणतेही जाती-पातीचे राजकारण नाही, त्यामुळे महायुतीचा विजय नक्की आहे. नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे तीन दावेदार होते. स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर आणि समृद्धी मयेकर. परंतु पक्षाने शिल्पा सुर्वे यांचे नाव जाहीर केल्यानंतर कोणतीही नाराजी न व्यक्त करता तिन्ही दावेदार अर्ज भरण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत.
पक्ष नाही तर एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे आमच्यात कोणतेही हेवेदावे नाहीत. ३२ जागांसाठी १७० इच्छुकांचे अर्ज आले होते. परंतु सर्वांचा आपण उमेदवारी देऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारी न मिळल्यामुळे फार मोठी नाराजी नाही. पक्षाने सांगितल्यानंतर अनेकजण थांबले आणि नवक्यांना संधी दिली. रत्नागिरीचा पर्यटनदृष्ट्या विकास कारणे हा मुख्य उद्देश आहे. शहर आता दीड ते दोन महिन्यात खड्डेमुक्त होईल. नगरसेवक म्हणून शिल्पा सुर्वे यांनी दोन टर्म उत्तम काम केले आहे. शिक्षक असलेल्या शिल्पा सुर्वे यांनी पालिकेत सभापती पदावर उत्तमरित्या काम केले. तळागाळातील जनतेशी त्यांचा थेट संवाद आहे. पारदर्शक कारभार करणाऱ्या म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाईल. पाच वर्षात शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवा आराखडा तयार केला जाईल. वर्षभरात नगराध्यक्षांसहीत नगरसेवकांनी आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला पाहिजे. जो उत्तम काम करेल त्यालाच नगरसेवक पदावर राहण्याची संधी दिली जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात देवरुख व गुहागर नगराध्यक्षपद भाजपाला देण्यात आले आहे. याठिकामणी भाजपची ताकद आहे. उर्वरीत राजापूर, चिपळूण, खेड, रत्नागिरी येथे शिवसेना नगराध्यपद लढवत आहे. सर्वच ठिकाणी महायुतीचा मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 18/Nov/2025














