रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा येथील पडीक बोटीच्या केबीनमध्ये गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 ग्रॅम वजनाचा 14 हजार 600 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात आली.
मोहन सिंग रामचंद्र भाट (26, रा. मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार कुशल हातिसकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे 14 नोव्हेंबर रोजी मांडवी, पेठकिल्ला, मिरकरवाडा मार्गे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिरकरवाडा येथील मलबार जेटीच्या बाजूला असलेल्या पडिक बोटीच्या केबीनमध्ये संशयित हा आपल्या पाठीमागे सॅक लावून संशयास्पद हालचाली करताना दिसून आला.
पोलिसांनी त्याची चौकशी व तपासण्ाी केली असता त्याच्या सॅकमध्ये गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला ताब्यात घेउन त्याच्या विरोधात एनडीपीएस ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 20(ब) 2 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस हवालदार अमोल भोसले, आशिष भालेकर, कुशल हातिसकर आणि रणजित जाधव यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 18-11-2025














