Ratnagiri : सेवानिवृत्तांच्या हयाती दाखल्यांसाठी नोव्हेंबर अखेरची मुदत

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाचे पेन्शधारक तसेच त्यांचे वारस यांना नियमित पेन्शन सुरू राहण्यासाठी हयातीचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक आहे. हे दाखले जमा करून घेण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर अखेरची मुदत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची लगबग सुरू आहे. अवघे पंधराच दिवस उरल्याने हयातीचे दाखले मिळवण्यासाठी ई-सेवा केंद्रांमध्ये पेन्शनधारकांची रांग लागली आहे.

केंद्र व राज्यशासनाच्या सेवांना पेन्शन नियमित राहण्यासाठी वर्षातून एकदा हयातीचा दाखला द्यावा लागतो. नोव्हेंबर महिन्यात ही मोहिम राबवण्यात येते. यावर्षीसुद्धा ही मोहीम सुरू झाली असून दि. ३० नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठांची हयातीचे दाखले काढून ते संबंधित विभागात, बँकेत जमा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यावर्षी शासनाच्या वतीने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिम राबवण्यात येत आहे. या पेन्शनधारकांना बँकेत न जाता घरी बसून या अॅपद्वारे हयातीचा दाखला उपलब्ध होत आहे. मात्र, राज्यशासनाच्या पेन्शधारकांसाठी ही सुविधा नसल्याने त्यांना ई-सेवा केंद्रांमधून आपले हयातीचा दाखला काढून संबंधित बँक किंवा विभागात नेवून द्यावा लागत आहे. वेळेत दाखला दिला नाही तर नियमित पेन्शनमध्ये अडचणी येणार असल्याने पेन्शधारकांची दाखले काढून घेण्यासाठी धांदल उडाली आहे.

कोणी हयातीसाठी तर कोणी आरक्षणासाठी रांगेत
सध्या नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज भरले जात असल्याने या इच्छुक उमेदवारांकडूनही विविध दाखले काढले जात आहेत. एकादा दाखला कमी असल्यास निवडणूक लढवण्याची संधी हुकणार आहे. पेन्शधारकांना हयातीचा दाखला न दिल्यास पेन्शन बंद होण्याची धास्ती आहे. त्यामुळे कोणी हयातीच्या दाखल्यासाठी तर कोणी आरक्षणाचा लाभ घेऊन निवडणूक लढवण्यासाठी रांगेत उभे राहून दाखले मिळवत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 18/Nov/2025