Leopard : बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता

पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची अखेर मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात जुन्नर विभागात सुमारे ११५ बिबट्यांचे प्रायोगिक तत्त्वावर निर्बीजीकरण करण्यात येणार असून, हा देशातील पहिला प्रयोग ठरणार आहे.

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी नाईक यांनी सोमवारी पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर वन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाईक म्हणाले, “बिबट्यांची संख्या वाढण्याचा वेग थांबवण्यासाठी निर्बीजीकरण प्रयोग आवश्यक आहे. पुढील सहा महिन्यांत हा प्रयोग किती परिणामकारक ठरतो, याचा अभ्यास करून पुढील धोरण ठरवले जाईल. गेल्या काही वर्षांत जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही भागांत पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवड प्रचंड वाढली.

त्यामुळे जंगलासारखे वातावरण तयार होऊन बिबट्यांना प्रजननासाठी सुरक्षित जागा मिळाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे. ऊसतोडीचा हंगाम आणि बिबट्यांचा प्रजनन काळ एकाचवेळी येत असल्याने मानवी संपर्क वाढतो आणि हल्ल्यांची संख्या वाढते. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी असलेले २०० पिंजरे अपुरे पडत असल्याने त्यांची संख्या एक हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

बिबटे स्थलांतरित करणार…
भारताने जसा चित्त्यांचा पुनर्वसन प्रकल्प राबविला, त्याच धर्तीवर काही आफ्रिकन देशांनी भारताकडून बिबट्यांची मागणी केली आहे. या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. तसेच ‘वनतारा’ प्रकल्पामध्ये काही बिबट्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील १० ते १२ दिवसांत काही बिबटे तिथे स्थलांतरित केले जाणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

बांबूभिंत उभारणार…
ताडोबा अभयारण्यात बफर क्षेत्राभोवती ५०० फूट लांबीची बांबूची भिंत उभारण्यात आली आहे. याच प्रकल्पावर आधारित आता पुणे आणि जुन्नर विभागातही अशीच बांबूची भिंत उभारण्याची योजना आहे. या बांबूची दर तीन वर्षांनी नियोजनबद्ध कापणी केली जाईल, ज्यामुळे तो प्रकल्प दीर्घकाल टिकेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 18/Nov/2025