रत्नागिरी : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए) अभ्यासक्रमासाठीचा प्रारूप आराखडा विकसित केला आहे. त्यामुळे आता बीबीएला नवीन अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. हा अभ्यासक्रम स्वीकारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.
बीबीए, बीएएमएस, बीसीए हे अभ्यासक्रम यंदापासून एआयसीटीईन आपल्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना आता एआयसीटीईची नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय नवा अभ्यासक्रम विकसित करण्याचे एआयसीटीईकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मिळून बीबीएसाठीचा नवा अभ्यासक्रम विकसित केला आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा, मागण्यांसह मूलभूत तत्त्वे, उदयोन्मुख कल लक्षात घेऊन तीन आणि चार वर्षे बीबीए अभ्यासक्रमासाठी १२० ते १६० श्रेयांकांचा प्रारूप अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
प्रारूप अभ्यासक्रमामध्ये आंतरविद्याशाखीय अनुभवाधिष्ठित शिक्षण, कार्यपद्धती, उद्योगसंबंधित प्रकल्पांवर भर देण्यासह समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचार, परिणामकारक संवाद कौशल्ये या अभ्यासक्रमातील मूलभूत घटक आहेत. उद्योग आणि शिक्षण यातील दरी दूर करण्यासाठी इंटर्नशिपचाही समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रम समजून घेऊन उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करण्याची मुभा आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढण्याबरोबरच नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 25/Oct/2024












