General Election 2025 | देवरुख नगर पंचायत निवडणुकीसाठी आठ उमेदवारी अर्ज अवैध

देवरुख : देवरुख नगर पंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये मंगळवारी झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचे २ व नगरसेवक पदाचे ६ असे एकूण ८ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ७व नगरसेवक पदासाठी ७३ अर्ज असे एकूण ८० उमेदवारी अर्ज निवडणूक प्रक्रियेत राहिले आहेत.

संगमेश्वर तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अमृता साबळे यांनी सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली. प्रथम नगराध्यक्ष पदाच्या अर्जाची छाननी करत असताना, अधिकृत उमेदवाराला पर्यायी उमेदवार अर्ज भरण्यात आले होते. यात अधिकृत उमेदवाराचे अर्ज वैध ठरवून पर्यायी उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

यामध्ये भाजपाच्या मृणाल शेट्ये यांना श्रद्धा इंदुलकर यांनी पर्यायी अर्ज भरला होता. हा अर्ज अवैध ठरवण्यात आला. याचप्रमाणे आपच्या अधिकृत उमेदवार दीक्षा खंडागळे यांना असलेल्या पर्यायी उमेदवार अनघा कांगणे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या ९ उमेदवारांपैकी ७उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले. नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये जान्हवी मोरे यांनी शिवसेना शिंदे गटातून व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. यातील शिंदे गटाचा एबी फॉर्म न मिळाल्याने हा अर्ज अवैध करण्यात आला. अपक्ष अर्ज वैध ठरला आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये देखील तुकाराम किर्वे यांनी देखील भाजपाकडून व अपक्ष अर्ज दाखल केले होते. यातील भाजपाचा एबी फॉर्म न मिळाल्याने हा अर्ज अवैध करण्यात आला असून अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये कविता नार्वेकर यांनी देखील भाजपाकडून व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. भाजपाच्या अर्जाला एबी फॉर्म न मिळाल्याने हा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अपक्ष अर्ज वैध ठरला आहे.

प्रभाग क्रमांक १० मध्ये श्रुती रेवणे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला होता. या अर्ज सोवत एबी फॉर्म नसल्याने हा अर्ज देखील अवैध ठरवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मनस्वी आंबेकर यांनी भाजपा व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. यातील भाजपाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे हा अर्ज अवैध ठरला आहे. त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रणाली विंचू यांनी देखील शिंदे गट शिवसेना पक्षाकडून व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. शिंदे गटाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे हा अर्ज अवैध ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 19/Nov/2025