लांजा : लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी १७जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या आठव्या दिवशी सोमावरी पर्यंत नगराध्यक्षपदासाठी ७, तर नगरसेवक पदासाठी ८० असे एकूण ८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर भाजप, शिवसेना उवाठा, काँग्रेस यांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष पदासाठी उबाठा सेनेकडूनपूर्वा मुळये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिंदे शिवसेनेचे लांजा-राजापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप यांच्या पत्नी सावली सुनील कुरूप यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शिवसेना-भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत सावली कुरूप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज आठव्या शेवटच्या दिवशी तब्बल २३ उमेदवारी अर्ज दाखल होऊन एकूण उमेदवारी अर्ज ८७दाखल झाले. महायुतीच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदासह १५ जागा लढत असून भाजपाला एकच जागा देण्यात आली आहे.
एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महायुती धर्माचे पालन करावे असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले असताना दुसरीकडे लांजा शहरात भाजपने महायुतीच्या आवाहनाला विरोध दर्शवत बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांच्या पत्नी प्रियांका संजय यादव यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्याने शिवसेना-भाजप महायुतिसमोर तेढ वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या कार्यकत्यांनी नगराध्यक्षपदासह एकूण आठ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. नगरसेवक पदासाठी मुग्धा मनोज चांदोरकर, ओमकार विश्वास आंब्रे, श्वेता प्रकाश तरळ, अंजली अनिल कांबळे, प्रमोद मनोहर कुरूप, शीतल चंद्रशेखर सावंत, अवंतिका चंद्रशेखर सावंत, किशोर तुकाराम यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मागील नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे तीन नगरसेवक असताना यावेळी एकच उमेदवार भाजपला दिल्याने शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जातो आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 19/Nov/2025














