रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार शंभर, दोनशे रुपयांच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी पाचशे रुपयांचा मुद्रांक द्यावा लागल्याने त्याची प्रचंड मागणी वाढली आहे. परिणामी, शहर आणि जिल्ह्यात ५०० रुपयांच्या मुद्रांकांची टंचाई आहे. यासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे रांगा लागत आहेत. मागणी वाढल्याने जाणवत असलेला आभासी तुटवड्यामुळे जादाचे पैसे आकारले जात असल्याची चर्चा आहे. पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्याने शंभर रुपयांचे घेतलेले पाचमुद्रांक काही राष्ट्रीयीकृत बँका नाकारत आहेत. परिणामी, मुद्रांकांवर काम करून घेणाऱ्यांची कोंडी होत आहे.
शासनाने शंभर, दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची एकाचवेळी राज्यातून मागणी वाढल्याने येथील कोषागार कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांना मागेल तितके पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पन्नास मागितल्यानंतर २० दिले जात आहेत. परिणामी, मिळालेले ५०० रुपयांचे मुद्रांक आपल्या नेहमीच्या ग्राहकांना आणि अधिक पैसे देणाऱ्यांना विकत आहेत. परिणामी, पाचशे रुपयांचे मुद्रांक सहजपणे उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांत मोठे कर्ज प्रकरण करण्यासाठी चार ते पाच प्रतिज्ञापत्र करावे लागतात. त्यासाठी त्यावर टाईपिंग करावे लागत आहे. पूर्वी हस्तलिखित होते; मात्र आता संगणकावर टाईप करून ते मुद्रांकावर घेऊन त्यांची प्रिंट काढली जाते. शंभर रुपयांचे पाच असतील, तर पाचवर प्रिंट करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. बँका पाचशे रुपयांचा एक असे पाच मुद्रांक आणा, असा आग्रह करीत आहेत. त्यासाठी ५०० रुपयांचे पाच मुद्रांक द्यावे लागत आहेत. पण, पाचशे रुपयांचे मुद्रांक न मिळाल्याने शंभर रुपयांचे पाच मुद्रांक एकत्र करून देण्याचा पर्याय ग्राहक निवडत आहेत. पण, अनेक राष्ट्रीयीकृत बँकांकडून शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद केल आहेत. त्यामुळे पाचशे रुपयांचेच हवेत, अशी सक्ती केली जात आहे. परिणामी, पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळविण्यासाठी धावाधाव करताना वाढलेल्या उन्हातान्हात घामाघूम होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 25/Oct/2024












