Pawas Bus Stand : पावस बसस्थानकामध्ये शौचालयाच्या टाकीची दुरवस्था; दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण

पावस : प्रवासी जनतेच्या मागणीनुसार, पावस बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची टाकी चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. शौचालयाची टाकी परिवहन खात्याला साफ करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अखेर त्याला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

पावस बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळे पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर पावस बसस्थानक इमारत व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले; परंतु नव्याने बांधलेल्या शौचालयाच्या टाकीचे काम योग्य न झाल्याने शौचालयाची टाकी वारंवार भरते आणि त्यातून पाणी बाहेर पडते. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटते. परिवहन खात्याकडून याची स्वच्छता सुरुवातीच्या काळात केली जात होती. त्यासाठी प्रत्येकवेळी खात्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता. हा वारंवार होणारा खर्च परवडत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावण्यात आले. बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले असता त्यांनी शौचालयाची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली. तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन पावस परिसरातील प्रवासी जनतेला दिले होते. मात्र, या गोष्टीला सहा महिने उलटले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

नियमितपणे साफ करत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी जनतेला त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त स्वच्छतागृह सुरू आहे. त्याचे पाणीही टाकीच्या बाहेर वाहत असल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे- सुरेश तिवरेकर, प्रवासी, गावडेआंबेरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 19/Nov/2025