रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्ल्यू क्लाऊड सॉफ्टटेक सोल्यूशन्स लिमिटेड यांच्यामध्ये ‘५ जी कनेक्टिव्हिटी व डिजिटल एंटरटेनमेंट’ सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. मडगाव, रत्नागिरी आणि उडुपी या तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आधुनिक डिजिटल सुविधा पुरविण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. नवी मुंबई येथील कार्यालयात या करारावर दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.
एआय, सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि अत्याधुनिक ५ जी तंत्रज्ञान क्षेत्रात ब्ल्यू क्लाऊड या कंपनीने वेगाने प्रगती केलेली आहे. या करारांतर्गत ३ रेल्वे स्थानकांवर टप्प्याटप्प्याने ५ जी तंत्रज्ञान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ५जी फिक्स वायरलेस अॅक्सेस (FWA) सेवा तसेच रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये डिजिटल मनोरंजन सुविधा प्रायोगिक स्वरूपात बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासादरम्यान अधिक वेगवान इंटरनेट, रिअल-टाइम माहिती आणि उच्च-गुणवत्तेचे मनोरंजन उपलब्ध होणार आहे. तसेच, या सुविधांची व्यवहार्यता, आर्थिक परिणामकारकता आणि प्रवाशांचा प्रतिसाद यांचे कोकण रेल्वे व ब्ल्यू क्लाऊड संयुक्त मूल्यमापन करणार आहेत.
हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर दोन्ही संस्था महसूल वाटप मॉडेलवर आधारित या सेवांची व्यावसायिक अंमलबजावणी आणि विस्तार करण्यासाठी पावले उचलणार आहे.
दर्जेदार सेवा देण्यास बांधील
व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा म्हणाले, ब्ल्यू क्लाऊड सॉफ्टटेक सोल्यूशन्स लिमिटेडसोबतची भागीदारी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या बांधीलकीशी सुसंगत आहे. ५ जी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन उपायांची अंमलबजावणी करत आहोत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 20/Nov/2025














