रत्नागिरी : शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांमधील इयत्ता ३ री ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ३४ शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा शुक्रवारी संपणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानीत शाळांमधील ३ री ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांकरिता ही परीक्षा होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होत आहे.
या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै या कालावधीत आयोजित केली होती. यानंतर आता पेंट २ ची परीक्षा २२ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात जि. प.च्या २ हजार ४२५, तर ६०९ खासगी अशा एकूण ३०३४ शाळांमध्ये ही परीक्षा होत आहे. सुमारे दीड लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होत आहे. पॅटच्या परीक्षेबाबत शिक्षण विभागाने योग्य नियोजन केल्याने या वर्षी गोंधळ झाला नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, संदेश कडव, आर. के. कांबळे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी सर्व शाळांना भेटी देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 25/Oct/2024












