Khed : वेरळ बसथांब्यावरील सुविधांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ रेल्वे फाट्याजवळ रखडलेले चौपदरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या परिसरातील प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. चौपदरीकरणामुळे प्रवास गतिमान झाला असला तरीही बसथांब्यावर प्रवासी शेड उभारलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे खेड परिसरातील काम वेळेत पूर्ण झाले होते. मात्र, वेरळ रेल्वे फाट्याजवळील काम करण्यास विलंब झाला. गेल्या काही महिन्यांत तेही काम पूर्ण करण्यात आलेले आहे; परंतु वेरळ येथे प्रवासी निवारा, थांबा किंवा दिशादर्शक फलक उभारलेला नाही. परिणामी, प्रवाशांना रणरणत्या उन्हात किंवा पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत आहे. नेमका थांबा कुठे आहे किंवा बस कुठे थांबते, याचीही स्पष्टता नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम असतो. वेरळ रेल्वेस्थानक फाटा आणि खोपी फाटा परिसरातील गुंतागुंतीत प्रवासी आणि वाहनचालक दोघांचीही फसगत होत आहे. सूचना व दिशादर्शक फलकाअभावी प्रवासी मेटाकुटीस आलेले आहेत. विरुद्ध दिशेने वेगात येणारी वाहने आणि सव्र्व्हिस रोडवरील अव्यवस्था यामुळे अपघातांचाही धोका वाढला आहे.

महामार्ग रुंदीकरणाच्या कामात महामार्गालगतची वृक्षतोड करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत आहे. याप्रकरणी ठेकेदार कंपनीने तत्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी- प्रसाद गांधी, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 20/Nov/2025