खेड : बोरज येथील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

खेड : रेल्वेतून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर कॉड तिवरे बोगद्यात घडली.

योगेश बाळाराम आग्रे असे या तरुणाचे नाव असून, तो खेड तालुक्यातील बोरज येथील राहणारा आहे. योगेश आग्रे हा रविवारी रत्नागिरी येथे कामासंदर्भात मुलाखत देण्यासाठी खेड येथून निघाला होता. त्यांच्या वडिलांनी त्याला शनिवारी रात्री ९ वाजता रिक्षाने खेड रेल्वेस्थानक येथे सोडले होते. त्यानंतर त्याने वडिलांना ‘तुम्ही घरी जा, मी येणाऱ्या रेल्वेने रत्नागिरीला जाईन,’ असे सांगितले. असे त्यानंतर योगेश रात्री रत्नागिरीकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला. मात्र, रविवारी सकाळी ९ वाजेदरम्यान राजापूर कॉड तिवरे बोगद्यात तो पडलेल्या स्थितीत ‘आढळला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तसेच त्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाली होती. बोगद्यात अनोळखी तरुण पडल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी राजापूर पोलिसांना दिली. त्यानंतर राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊ पाहणी केली. मात्र, ही घटना लांजा पोलिस, स्थानकाच्या हद्दीत घडली असावी या हेतूने लांजा पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच लांजाचे पोलिस उपनिरीक्षक अनमोल सरगंले, पोलिस हवालदार तेजस मोरे, दिनेश आखाडे, सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. हे घटनास्थळ राजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत असल्याने लांजा येथे नोंद करून पुढील तपास राजापूर पोलिसांकडे देण्यात येणार आहे. योगेश आग्रे हा रात्रीच्या रेल्वेने प्रवास करत असल्याने त्याला झोप लागली असावी. त्यामुळे तो रत्नागिरीत न उतरता पुढे गेला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. झोपेतच रेल्वेतून तोल जाऊन पडून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 25-10-2024