चिपळूण : मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी चिपळूण आणि परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या समान ठेवण्याचा प्रयत्न या वेळी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत यावर्षी मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही, याची दक्षता निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत चिपळूण शहरातील काही ठराविक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. नागरिक सायंकाळी मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही जादा वेळ देऊन त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आली. शहरातील अनेक केंद्रांवर हा प्रकार घडला. त्याची कारणे शोधण्यात आली. त्यामध्ये काही केंद्रांवर मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती तर कुठे मतदारांची संख्या अगदी कमी होती. खेंड कन्याशाळेच्या परिसरात एका केंद्रावर १३०० मतदार होते, तर दुसऱ्या केंद्रावर केवळ ७०० होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी हजारप्रमाणे मतदारांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी टळणार आहे.
गोवळकोट, काविळतळी, खेंड, चिंचनाका, चावडी या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न निवडणूक शाखेने केला आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी होते त्या केंद्रांवर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर गर्दी कमी होईलच त्याशिवाय मतदारांची गैरसोयही कमी होणार आहे.
मतदान केंद्रांवर मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोयी होणार नाही, याची काळजी निवडणूक विभागाने घेतली आहे. मतदान केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मतदारांच्या याद्यांचे विभाजन करण्यात आले आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – आकाश लिगाडे, निवडणूक निर्णय अधिकारी चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 25/Oct/2024












