आमदार किरण सामंत यांच्या कन्या अपूर्वा सामंत यांना ‘युवासेने’त मानाचे पान; राज्य कार्यकारिणीवर मोठी संधी

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषतः लांजा-राजापूर मतदारसंघात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अपूर्वा किरण सामंत (Apurva Kiran Samant) यांच्यावर शिवसेना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या युवा फळीला बळकटी देण्यासाठी अपूर्वा सामंत यांची “युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य” (Yuvasena Executive Committee Member) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज (२० नोव्हेंबर) याबाबतचे अधिकृत पत्र प्रसारित करण्यात आले आहे.

कार्याची घेतली राज्यपातळीवर दखल

अपूर्वा सामंत या रत्नागिरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते किरण सामंत (MLA Kiran Samant) यांच्या कन्या आहेत. मात्र, केवळ राजकीय वारसा न मिरवता त्यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. जनसामान्यात मिसळून काम करणारे आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेणारे ‘युवा नेतृत्व’ म्हणून त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची आणि संघटन कौशल्याची दखल घेत आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर थेट राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्ती पत्रात काय म्हटले आहे?

युवासेनेचे मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथून हे नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की:

“वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शिवसेना पक्षाच्या ‘युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य’ पदी नियुक्ती करण्यात येत आहे.”

ही नियुक्ती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी आणि मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा

बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी अपूर्वा सामंत सर्वांना सोबत घेऊन कार्य करतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. या निवडीनंतर रत्नागिरी आणि लांजा-राजापूर भागातून अपूर्वा सामंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.