‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जीवनावर नवी मालिका; मधुराणी गोखले, डॉ. अमोल कोल्हे साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग आणि संघर्षमय जीवनाचा आढावा घेणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची, तर डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतिराव फुलेंची भूमिका साकारणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे.

जवळपास दीडशे वर्षांपूर्वी महिलांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करून केलेला ऐतिहासिक संघर्ष आणि त्यातून घडलेली क्रांती या मालिकेतून आजच्या पिढीला पाहायला मिळेल.

त्यांचे क्रांतिकारी विचार पोहोचवणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मत कलाकारांनी व्यक्त केले आहे. ५ जानेवारीपासून ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही मालिका फक्त ‘स्टार प्रवाह’वर पाहायला विसरू नका, असे आवाहन जगदंब क्रिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:50 PM 20/Nov/2025