रत्नागिरी : येथे दिव्यांगांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावलीसाठी अनेकविध साहित्य बनविले आहे. त्याच्या विक्रीचा स्टॉल शुक्रवारपासून (दि.२५ ऑक्टोबर) सुरू होणार आहे.
आविष्कार संस्था गेली ३७ वर्षे कार्यरत आहे. प्रौढ दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये एक उत्पादक घटक बनवण्याकरिता शामराव भिडे कार्यशाळा गेली ३२ वर्षे कार्यरत आहे. आजवर ४२ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश मिळाले आहे. कार्यशाळेमध्ये सध्या हस्तकला, स्टेशनरी मेकिंग, शिवण, गृहशास्त्र, प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत.
कार्यशाळा आणि श्रीमती मीरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये खास दीपावलीकरिता लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत आहेत. विक्री केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांची पुढील कौशल्ये विकसित होण्यासाठी मोलाचा मदत मिळते. कार्यशाळेच्या या कार्याची दखल घेत जे. एस. डब्ल्यू फाउंडेशनने आपल्या कलादालनामध्ये आविष्कारच्या शामराव भिडे कार्यशाळा विद्यार्थी निर्मित वस्तू विक्रीसाठी ठेवून मदतीचा हात दिला आहे. वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते.
रत्नागिरीत शुक्रवारपासून कार्यशाळेचे विक्री केंद्र सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी होणार आहे. हे केंद्र येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेमध्ये हे सुरू राहणार आहे. या केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष सीए बिपिन शहा, संस्था सचिव प्रा. डॉ. सोनाली कदम, कार्यशाळा समिती अध्यक्ष सिद्धेश वैद्य आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 25-10-2024












