संगमेश्वर : कसबा देवपाटवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत चौघांना सहा महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. किशोर देवजी चांदे (वय ५४), शुभम राजेश चांदे (२१), राजेश देवजी चांदे (४६), आदित्य राजेश चांदे (१९, रा. कसबा देवपाटवाडी) या सर्वांना न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संतोष रघुनाथ चांदे आणि किशोर चांद हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच वाडीत राहणारे आहेत. त्यांचा जमिनजागेवरून वाद आहे. कसबा देवपाटवाडी या ठिकाणी त्यांच्या घराजवळ दुचाकी लावण्यासाठी संतोष रघुनाथ चांदे हे प्लास्टिकची शेड बांधत असताना किशोर देवजी चांदे यांनी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात, असे विचारून संतोष चांदे यांची पत्नी संपदा संतोष चांदे यांच्या कानाखाली मारून शिवीगाळ केली. त्यानंतर आणखी तिघांनी तिथे येऊन वादविवाद करून धक्काबुक्की केली.
तसेच ते राहत असलेल्या झोपड्याजवळ नेऊन दत्ताराम चांदे यांच्या डोक्यात मारहाण केली. या प्रकरणी किशोर देवजी चांदे शुभम राजेश चांदे, राजेश देवजी चांदे आदित्य राजेश चांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी देवरूख न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी सात हजारांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास दोन महिने कारवास भोगावा लागणार आहे. या प्रकरणी तपासिक अंमलदार म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष झापडेकर, साळुंखे यांनी तपास केला. सरकारी वकील म्हणून अमृता गुरुपादगोळ यांनी कामकाज पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 25/Oct/2024












