चिपळूण : शहरालगतच्या कळबंस्ते येथील शासनाच्या पडीक जागेत वनस्पती उद्यान आणि देवराईची हिरवळ वाढत आहे. देवराई अधिक सुशोभित होण्यासाठी येथे शहर परिसरातील विद्यार्थ्यांनी देवराईस भेट देत विविध वनस्पती व देवराईच्या झाडांची माहिती घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देवराईत वाढलेले गवत व कचरा काढून बुधवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवले.
येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत प्रशासकीय अधिकारी, विविध सेवाभावी संस्था, कंपन्या आणि सह्याद्री निसर्ग मित्रच्या माध्यमातून कळबंस्ते येथे देवराई आणि वनस्पती उद्यान विकसित केले आहे. सुमारे दोनशेहून अधिक प्रजातीची दीड हजार झाडे येथे लावली असून, पावसाळ्यात लावलेली ही झाडे चांगलीच वाढू लागली आहेत. जी रोपे मृत पावली तेथे नव्याने त्याच जातीची रोपे पुन्हा लावण्यात आली. काही रोपे जिल्ह्यात न मिळाल्याने ती पुण्यातून आणली. विद्यार्थ्यांना या वनस्पतींच्या बोटॅनिकल बॅलची माहिती होण्यासाठी प्रांत कार्यालय व गटशिक्षणाधिकारी यांच्यातर्फे डी. बी. जे. महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी, आर. सी. कॉलेज पेढे, गद्रे इंग्लिश स्कूल चिपळूण, ख्रिस्त ज्योती स्कूल वालोपे, मेरी माता स्कूल खेर्डी या शाळांतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी भेट देऊन स्वच्छता अभियान उपक्रम राबविला.
या विद्यार्थ्यांना वनस्पती उद्यान व देवराईबाबत तसेच झाडांची निगा, त्यांचे फायदे व आयुर्वेदिय उपयोग बोटॅनिकल गार्डन तयार करणे, मधमाशी/फुलपाखरू वस्तीस्थान निर्माण करणे, पक्षांमार्फत १५ कि.मी. अंतरामध्ये फळझाडे, फुलझाडे यांचे परागीकरण याबाबत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी माहिती सांगितली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 21-Nov-2025












