रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथील नगरपालिकेच्या शाळा क्र. १९ (उर्दू) येथे शिकवणीदरम्यान नव्याने बसवण्यात आलेला पंखा अचानक कोसळून शिक्षिका जखमी झाली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शहनाज इमदाद मुल्ला, असे जखमी शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे शाळेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने, विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेच्या वेळी शिक्षिका शहनाज मुल्ला वर्गात शिकवत असताना पंखा सरळ त्यांच्या डोक्यावर कोसळला.
पंख्याचे काम नव्याने केले असल्याने त्याची गुणवत्ता, तांत्रिक पाहणी आणि बसवण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमी शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पालक मोठ्या संख्येने शाळेत धावून आले; मात्र विद्यार्थ्यांना इजा झाली नसल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला; मात्र नव्या कामातील निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 21-Nov-2025














