भविष्य असलेल्या करिअरवरच लक्ष केंद्रित करावे : माधव अंकलगे

गणपतीपुळे : येणाऱ्या पन्नास वर्षांत ज्या करिअरमध्ये भविष्य आहे, त्याच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने करिअर विद्यार्थ्यांनी निवडावे, असे आवाहन व्याख्याते माधव अंकलगे यांनी केले. खेड – वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश स्कूलतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ‘इयत्ता दहावीनंतर काय?’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अंकलगे यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या विभागातील करिअरसोबतच आपली आवड, आपली क्षमता, त्या त्या करिअरची उपलब्धता यावर भर देऊन निवड करण्यात यावी अशी माहिती दिली. इयत्ता दहावीच्या वर्गात परीक्षेला सामोरे जाताना ताणतणाव न घेता वेळ, विषयाची काठिण्यपातळी, आहार आणि आरोग्य यांचा समन्वय साधून अभ्यासाचे नियोजन केल्यास यश गाठता येते, असे अंकलगे म्हणाले. या कार्यक्रमाला वेरळ श्री समर्थ कृपा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, सचिव शेटवे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जोशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 21-Nov-2025