शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महाकृषी विस्तार अॅपची गरज : कृषी अधिकारी एम. ए. गीते

पाचल : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला हवामान बदल, बाजार भाव समजावा, कीड रोगाचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात माहिती मिळावी, अवजारांची उपलब्धता, शासनाच्या कृषीपुरक योजना आदीसंदर्भात माहिती देण्यासाठी शासनाने महा कृषी विस्तार अॅप कार्यान्वित केले आहे. शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी महाकृषी विस्तार अॅपची गरज असून, आपण सर्वांनी ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाऊया, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी एम. ए. गीते यांनी केले.

येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित महा कृषी विस्तार अॅप मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम होते.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी एस. ए. चौधरी, करिष्मा नदाफ आदी उपस्थित होते. कोकणातील शेतकरी पारंपरिक शेती करतो. या शेतकऱ्यांनी महाकृषी विस्तार अॅप डाऊनलोड करून घ्यावे आणि कृषी संबंधित विविध शासकीय योजनातील अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी आर. एन. क्षीरसागर यांनी केले.

भारत हा कृषिप्रधान आणि खूप मोठी लोकसंख्या असणारा देश आहे. या देशाच्या अन्नधान्याची गरज मोठी असून कृषी संदर्भात येणाऱ्या सर्व नवीन तंत्राची आणि तंत्रज्ञानाची माहिती या महा कृषी विस्तार अॅपवर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे अॅप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, तर आभार प्रा. एस. जी. चव्हाण यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 21-Nov-2025